मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता तयारी सुरु केली असून त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर पक्षाला बळकटी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच प्रकर्षाने लक्ष असणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू देखील एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटी देखील वाढल्या आहेत. त्यातच अंबरनाथ येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली असल्याचा देखील राज ठाकरे यांनी आरोप केला आहे. असे प्रकार पुढे घडू नयेत यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. राज ठाकरे सध्या अंबरनाथ, बदलापूर व उल्हासनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध ठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.
राज ठाकरे म्हणाले, अनेकांचा असा विश्वास आहे की निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मोठ्या प्रमाणात मतचोरी होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली. यापुढे हे प्रकार रोखण्यासाठी आपण मतदार याद्यांवर काम केले पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याला आपापल्या प्रभागातील मतदार याद्या तपासा, त्यात असलेल्या त्रुटी दूर करा. तसेच कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास त्याची नोंद घ्या, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.
पक्षातून बाहेर पडलेल्या पदाधिकाऱ्यांवर कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. जे गेले ते आपले नाहीत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच पक्षात एकीची भावना निर्माण झाली असून कामाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या अंबरनाथ दौऱ्यापूर्वी शहरात लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बॅनरवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो छापण्यात आले होते. तसेच ‘महाराष्ट्रात फक्त ठाकरेच’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. इतकेच नव्हेत तर आदेश मिळाला तर सोनं लुटायला वाजतगाजत जाऊ, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. यामुळे दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे.