---Advertisement---

दादांचे सूचक विधान : …नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल !

By team
On: September 20, 2025 10:02 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचक विधान केले आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांना महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आणि पालकमंत्र्यांना पालकमंत्री म्हणून नेमलेल्या जिल्ह्यात जावेच लागेल, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला. नागपूर येथे आयोजित पक्षाच्या चिंतन शिबिरात ते बोलत होते.

मी आज निर्वाणीचे सांगतो, पक्षापेक्षा मंत्र्यांना व काहींना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया म्हणजे गांभीर्य कळेल, अशा शब्दांत पवार यांनी फटकारले. पालकमंत्री केवळ १५ आॅगस्ट, २६ जानेवारी व १ मे महाराष्ट्रदिनी झेंडावंदन करण्यासाठी नाही. पालकमंत्री आणि मंत्र्यांना त्याव्यतिरिक्त इतर जिल्हे आणि तालुक्यात जावे लागेल. तिथे गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व आमदारांना बरोबर घेऊन लोकांमध्ये फिरावे लागेल. पूर्वी चालायचे तसे आता चालणार नाही. छोट्या- मोठ्या चुका दुरुस्त कराव्या लागतील. नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल, एवढीच नोंद मंत्र्यांनी घ्यावी, असा सज्जड दम अजित पवारांनी भरला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी व मंत्र्यांकडून लोकांना प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची अपेक्षा आहे. लोकांचे ऐकले पाहिजे, जनसंवाद सुरू राहिला पाहिजे, मते गांभीर्याने घेतली पाहिजे. बघू, करू, आज या, उद्या या, तिकडे भेटा असे हेलपाटे मारायला लावू नका असे आवाहन पवारांनी केले.

पदाधिकारी, मंत्री व कार्यकर्त्यांनीही वेळेला महत्त्व दिले पाहिजे, वेळेत आले पाहिजे. एक दिवस पक्ष तुम्हाला सांगतो की वेळेत या तरीदेखील काहींना त्रास होतो. आता वाटते की, एकदा विमानासारखी दारे बंद करावी लागतील. सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे, असेही पवार यांनी या वेळी सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आठवड्यातले कुठले तीन दिवस मुंबईत राहायचे, उरलेल्या चारपैकी एक दिवस मतदारसंघात आणि उरलेले तीन दिवस पक्षकार्यासाठी द्यायचे आहे हे ठरवले पाहिजे. या वेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तुमची मेहनत नेतृत्वाला दिसते. त्याची दखल घेतली जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. पक्षात नावापुरती पदे नसतील, त्यासाेबत तर जबाबदारी येईल, परफाॅर्मन्स ऑडिट होईल असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!