सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिम गावात घटस्थापनेपूर्वी कपडे धुण्यासाठी गेलेली दोन मुले कासारगंगा ओढ्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुले वाहून गेल्याचे कळताच तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली, मात्र दुर्दैवाने काही अंतरावर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. श्रीधर किरण ऐवळे आणि सोमनाथ विठ्ठल ऐवळे अशी मृत मुलांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यातील महिम गाव परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कासारगंगा ओढ्याला नदीचे स्वरूप आले होते आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान होता. ओढ्याच्या प्रवाहात आई सोबत नदीवर कपडे धुवायला गेलेला मुलगा व पुतण्या आईच्या डोळ्यादेखत ओढ्यात वाहून गेले. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच, संपूर्ण गाव ओढ्याकिनारी जमा झाला. ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळाने प्रशासनाचाही ताफा घटनास्थळी दाखल झाला. कुटुंबीयांच्या आक्रोशाने वातावरण शोकाकुल झाले होते. प्रशासनाचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुलांचा शोध घेण्यासाठी पंढरपूरहून एनडीआरएफच्या टीमची मदत मागवण्यात आली होती. अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, ऐवळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अलीकडील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ओढे-नाले उफाळून वाहत आहेत. साधारणत: लहानसा वाटणारा कासारगंगा ओढा देखील प्रचंड वेगाने वाहत असल्याने तो नदीसारखा धोकादायक बनला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने पावसाळ्यात ओढे-नाल्यांच्या काठावर जाणे किती धोकादायक ठरू शकते, याचे उदाहरण समोर आले आहे.