ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठवाड्यात पावसाचा कहर : ओढे-नद्यांना पूर, शेती पाण्याखाली तर अनेक गावांचा संपर्क तुटला !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा हाहाकार सुरू असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ढगफुटीसदृश्य पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या अवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरावून घेतले असून, शेतीतलाव, ओढे, नद्यांना पूर आल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कन्नड तालुक्यात वाकी नदीला पुन्हा पूर आला आहे. पैठण शहरात देखील कहारवाडासह अनेक भागातील घरात पाणी शिरले. तर जायकवाडी, राहुलनगर येथील 50 घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मागील आठ दिवसांत पैठण तालुक्यात सतत धार पावसाची सुरू आहे, यामुळे शेती अद्याप पाण्याखाली असतानाच आज सोमवारी पहाटे पासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने जायकवाडी, राहुलनगर या भागातील अनेक घरात गुढ्यापर्यंत पाणी साचले आहे, या ठिकाणी प्रशासनाने चार दिवसांपूर्वी पाहणी केली. मात्र कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने आज सुरू असलेल्या पावसाने पुन्हा अनेक घरात पाणी शिरले आहे.

परभणी जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने पारंपरिक आणि नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूरमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. भेटा-आंदोरा गावाचा संपर्क तुटला असून, रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जालन्यात नद्या-नाले ओसंडून वाहत असून शेती पाण्याखाली बुडाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे आणि अंबड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी मध्यरात्री बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपून काढले. शिरूर कासारमध्ये मुसळधार पावसामुळे सिंदफणा नदीला पूर आला असून, नदीचे पाणी बाजारपेठा आणि घरांमध्ये शिरले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. शिरूर येथील सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातून सिंदफणा नदीत मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून, 62,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी-जास्त केला जाऊ शकतो, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि परांडा तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे चावडी शाळा आणि अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. परंडा तालुक्यातील शिरसाव येथे नदीला आलेल्या महापुरामुळे जवळपास 200 ते 300 लोक अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!