---Advertisement---

पक्षश्रेष्ठींनी आपल्याला काम द्या ; धनंजय मुंडेंची पक्षश्रेष्ठींना विनंती !

By team
On: September 22, 2025 5:18 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांना काही महिन्यापूर्वी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून आपल्या पक्षश्रेष्ठींना आपल्याला रिकामे न ठेवता काहीतरी काम अर्थात जबाबदारी देण्याची विनंती केली आहे. त्यांच्या या जाहीर विनंतीवरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या विनंतीवर विचार केला जाईल असे सूतोवाच केल्याने मुंडे यांचे लवकरच राजकीय पुनर्वसन होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

धनंजय मुंडे हे राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री होते. पण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात त्यांचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडचे नाव आल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादीत मागे पडल्याचे चित्र होते. पण आता त्यांनी थेट मंचावरून पक्षश्रेष्ठींकडे काम मागून आपले राजकीय पुनर्वसन करण्याची विनंती केली आहे. त्याचे झाले असे की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा रायगडमध्ये नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना धनंजय मुंडे यांनी तटकरेंवर स्तुतीसुमने उधळत आपल्याला रिकामे न ठेवता काहीतरी जबाबदारी देण्याची विनंती केली.

सुनील तटकरेंनी मला वडिलांसारखा आधार दिला. त्यांचे अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध आहेत. महाराष्ट्राच्या मातीत काय चालले आहे? याची त्यांना जाणीव असते. कोकणचा विकासपुरुष म्हणूनही ते ओळखले जातात. ते आमच्यापेक्षा जास्त तरूण आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच आज मी येथे उभा आहे. त्यामुळे त्यांनी त्यांनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत रहावे. चुकले तर कान धरावा. पण आता रिकामे ठेवू नका. काहीतरी जबाबदारी द्या, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यांच्या या विधानावर सुनील तटकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे यांनी काहीतरी काम द्या अशी मागणी केली. त्यावर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले.

मुंडेंच्या विनंतीचा मान केला जाईल – अजित पवार

दुसरीकडे, पत्रकारांनी मुंडे यांच्या विधानाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना छेडले असता त्यांनीही याविषयी योग्य तो विचार केला जाईल असे स्पष्ट केले. धनंजय मुंडे यांच्या विनंतीला मान दिला जाईल. त्यांच्या विनंतीचा योग्य तो विचार केला जाईल, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे धनंजय मुंडे यांचे लवकरच राज्याच्या राजकारणात पुनर्वसन केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!