---Advertisement---

केवळ पर्यटनासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ नये ; शिंदेंची ठाकरेंवर टीका !

By team
On: September 25, 2025 10:37 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मोठी मदत देणे अपेक्षित आहे. ज्यांना मदत द्यायची असेल त्यांनी मदत घेऊन नक्की शेतकऱ्यांच्या बांधावर जावे. मात्र, केवळ पर्यटनासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊ नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर टीका केली आहे. सध्या संकटाची वेळ आहे. अशावेळी ज्याला जेवढी शक्य आहे, त्याने तेवढी मदत देणे अपेक्षित आहे. मात्र विरोधक केवळ मदत देणाऱ्यांवर टीका करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पूरग्रस्त भागातील काही जिल्ह्यांचा दौरा करत पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे देखील पूरग्रस्त मराठवाड्यात पाहणी दौऱ्यासाठी येत आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

काही लोक केवळ पर्यटनासाठी दौरा करत असल्याची टीका त्यांनी केली. आम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ज्या वस्तू देत आहोत, त्या बघा. त्यावरील फोटो कशासाठी बघता? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. कार्यकर्त्यांनी फोटो लावले असतील, पण ते पाहण्याऐवजी मदतीसाठी दिलेले साहित्य पहा. सध्या संकटातील शेतकऱ्यांना मदत देणे हे जास्त महत्त्वाचे आहे. कोणी कोणत्या पद्धतीने मदत दिली, यापेक्षा शेतकऱ्यांना मदत मिळणे हे जास्त महत्त्वाचे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

एकीकडे शेतकरी संकटात आहे. अशावेळी राज्य सरकार आणि सर्वच मंत्री शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे काही लोकांना विरोधी पक्ष नेते पदाचे पडले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. सरकार विरोधी पक्षनेतेपद देत नसल्या वरुन संजय राऊत यांनी काल राज्य सरकारवर टीका केली होती. यावर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!