अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असून आता अहिल्यानगर जिल्ह्यात दि.14 पासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीपिकांसह रस्ते, वीज, आणि बंधाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. 12 तालुक्यात अतिवृष्टीचा फटका बसून, तब्बल 283 तलाव, बंधारे फुटल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अजुनही काही ठिकाणी पाहणी बाकी असून, नुकसानीची ही आकडेवारी वाढणारी आहे.
जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून उभे केलेले पाझर तलाव, साठा बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, गाव तलाव, वळचणी बंधारे हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहेत. पावसाळ्यात पाणी अडवून बंधाऱ्यात ते साठवल्यामुळे हजारो हेक्टर पिकांची सिंचनाची, जनावरांच्या पाण्याची तसेच काही ठिकाणी मानवी वस्त्यांचीही तहान भागविण्याचे काम यातून होते. त्यामुळे पावसाळ्यात बंधारे भरल्यानंतर शेतकरी त्याचे जलपूजन करताना दिसतात.
साधारणतः 1972 च्या दरम्यान रोजगार हमी अंतर्गत बहुतांशी पाझर तलाव उभारले होते. मात्र त्यानंतर दुरुस्तीसाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच अनेक तलाव हे धोकादायक असल्याचे लक्षात आले होते.
दि. 14 पासून परतीच्या पावसाने शेवगाव, पाथर्डी, नगर, कर्जत, जामखेडसह अन्य तालुक्यांनाही झोडपले. त्यामुळे अनेक ठिकाणी भराव वाहून गेल्याचे दिसले. अशाप्रकारे सुमारे 283 तलाव, बंधाऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. कार्यकारी अभियंता शिवम डपकर, उपअभियंता आनंद रुपनर आदींच्या टीमने पावसाने नुकसान झालेल्या बंधारे, पाझर तलावाची पाहणी करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.
दरम्यान, काही भागात अजुनही पाणी आहे. त्यामुळे शेतात जाता येत नाही. परिणामी बंधाऱ्यांची नुकसानीची पाहणी तसेच दुरुस्ती काही दिवस शक्य नसल्याचे दिसते आहे. निसर्गावरील अतिक्रमण, राजकीय भांडवल व फायदा, तांत्रिक चुका यामुळे ही नैसर्गिक आपत्ती ओढावल्याचे बोलले जाते.