---Advertisement---

महाराष्ट्राचा ‘अलर्ट मोड’ : साठा सापडल्यास तत्काळ कारवाई ; मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश !

By team
On: October 6, 2025 11:08 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. ‘कोल्ड्रिफ’ या खोकल्याच्या औषधामुळे विषबाधा होऊन एकूण 17 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनांनंतर महाराष्ट्र सरकारने तात्काळ हालचाल करत, राज्यातील नागरिक आणि मेडिकल दुकानदारांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने एक टोल फ्री क्रमांक सुरू केला असून, या औषधाचा कोणताही साठा सापडल्यास तत्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे. तसेच ‘कोल्ड्रिफ’ सिरपची विक्री, वितरण आणि वापर पूर्णपणे थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या औषधात अत्यंत धोकादायक असा डायथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol) हा रासायनिक घटक आढळून आल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. तामिळनाडूच्या कांचीपुरम येथील युनिटमध्ये बनवलेल्या या सिरपमध्ये 48.6 टक्के डायथिलीन ग्लायकोल असल्याचे निष्पन्न झाले. हा घटक सामान्यतः औषधनिर्मितीत 0.1 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात असू नये. पण कोल्ड्रिफ सिरपमध्ये त्याचे प्रमाण जीवघेणे ठरले आहे. तज्ज्ञांच्या मते, हा रसायन शरीरात गेल्यावर मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्था निकामी करते. त्यामुळेच या सिरपचे सेवन केलेल्या बालकांचा मृत्यू मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मध्य प्रदेशात 14, राजस्थानात 3 बालकांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात 14 चिमुकल्यांचा आणि राजस्थानात 3 मुलांचा या सिरपच्या सेवनानंतर मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेश सरकारने ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’ वर तत्काळ बंदी घातली असून, सिरप तयार करणाऱ्या कंपनीच्या विरोधात गंभीर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कारवाईसह एका डॉक्टरलाही अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी सांगितले की, मृत मुलांपैकी बहुतेकांना हे सिरप ताप आणि खोकल्यासाठी दिले गेले होते. पण काही तासांतच त्यांना उलट्या, मूत्र विसर्जन बंद होणे, आणि कोमासारखी लक्षणे दिसू लागली. हे दृश्य पालकांसाठी भयावह ठरले. या घटनेनंतर देशभरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनांची दखल केंद्र सरकारने गंभीरतेने घेतली असून, सर्व राज्यांना तत्काळ सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू सरकारने आपापल्या हद्दीत औषध दुकाने, घाऊक विक्रेते आणि रुग्णालयांवर छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने बॅच क्रमांक SR-13 असलेले औषध सर्वत्र शोधून जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर, नाशिक, मुंबई आणि औरंगाबादमध्ये या औषधाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. राज्य सरकारने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांच्या घरी ‘कोल्ड्रिफ’ सिरप असेल, तर ते औषध तात्काळ वापरात आणू नये आणि FDAच्या टोल फ्री क्रमांकावर (1800-222-365) संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!