ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जयंत पाटलांनी सोडले मौन : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम होणारच !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यातील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आता स्वतः जयंत पाटील यांनी मौन तोडले आहे. काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी खालच्या दर्जाची टीका केली होती. या वक्तव्यावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना फटकारले होते, तरीही त्यांनी आपल्या टीकेचा सूर कायम ठेवला. मात्र, पाटील यांनी आतापर्यंत एकदाही थेट प्रत्युत्तर दिले नव्हते. अखेर इस्लामपूरमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केले. त्यांनी पडळकरांना अप्रत्यक्षपणे सडेतोड इशारा दिला.

जयंत पाटील म्हणाले की, वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्याचे उत्तर देऊ, तोपर्यंत वाट बघा. टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम होणारच. मी मागेही म्हटले होते की, आपले नाव ऐकले नाही असे एकही गाव नाही आणि सगळ्यांना हाणले नाही तर जयंत पाटील माझे नाव नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यांच्या या भाषणातून त्यांनी पडळकरांना थेट नाव न घेता इशारा दिला आणि आपल्या शांततेचा अर्थ भीती नसल्याचे स्पष्ट केले. पाटील यांच्या या भाषणानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना ऊत आला आहे.

यानंतर पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडळकरांना समज दिली होती, असे मी ऐकले आहे. मात्र त्यांनी त्यातून काही धडा घेतला का, हे माहीत नाही. माझ्याविरोधात अनेकांनी मिळून चौकशी मागितली, आरोप केले, पण मला काही अडचण नाही. फक्त बोलू नका, माझी चौकशी करा, असे मी सांगतो. त्यांनी पुढे सांगितले की, एका व्यक्तीने माझ्या आईवडिलांबद्दल गलिच्छ भाषा वापरली आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या समर्थनार्थ सगळ्यांनी सभा घेतल्या. भाजपमध्ये असा प्रकार मी कधी पाहिला नव्हता. त्यामुळे आमच्या भागातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकांना आता सर्व काही समजले आहे आणि याला उत्तर लोक मतपेटीतूनच देतील, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या शांततेवरूनही सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंत चर्चा सुरू होती. प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर तुम्ही शांत का आहात? या प्रश्नावर पाटील म्हणाले की, मी प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या मतदारसंघातील जनतेला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. माझा जनसंपर्क कमी झाला होता. आता ती जबाबदारी नसल्याने मी लोकांमध्ये जाऊ शकतो, त्यांच्या समस्या ऐकू शकतो. त्यांनी यावेळी आपल्या कार्यपद्धतीत झालेल्या बदलाबाबतही भाष्य केले. लोकांच्या प्रश्नांवर उपाय शोधणे हेच आमचे ध्येय आहे. काही जण फक्त बोलत राहतात, पण आम्ही प्रत्यक्ष काम करून दाखवतो, असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय धोरणाचा रोखही स्पष्ट केला.

जयंत पाटील यांच्या या भाषणातून त्यांनी पडळकरांना दिलेला अप्रत्यक्ष इशारा आणि आपल्या संयमी भूमिकेचे स्पष्टीकरण या दोन्ही गोष्टी दिसून आल्या. एकीकडे त्यांनी विरोधकांवर प्रहार केला, तर दुसरीकडे आपल्या राजकीय भूमिकेचे स्पष्टीकरण देत कार्यकर्त्यांना आत्मविश्वास दिला. निवडणुकीत जनता उत्तर देईल, असे सांगत त्यांनी पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावरचा राजकीय अंकाचा समारोप केला. इस्लामपूरच्या सभेत जयंत पाटील यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात हा वाद किती तीव्र होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!