---Advertisement---

स्वकर्तृत्व आणि प्रामाणिकतेच्या बळावर पाटील यांनी कार्याचा ठसा उमटविला

By team
On: October 13, 2025 5:45 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

आजारी कारखान्याचे डॉक्टर म्हणून ओळख असलेल्या रविकांत पाटील यांच्याकडे विनम्रता, धैर्य, स्पष्टता आणि प्रामाणिकपणा असल्यामुळे ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले, असे गौरवोद्गार माजी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी काढले. रविवारी चपळगाव (ता. अक्कलकोट) येथे श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविकांत पाटील यांच्या एकसष्टी निमित्त भव्य सत्कार सोहळा आणि गौरवग्रंथाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंडचे आमदार राहुल कुल हे होते. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, स्वागताध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, सिद्धेश्वर कारखान्याचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी, राजशेखर शिवदारे, महेश देशमुख, व्ही.पी. पाटील, शहाजी पवार, कांचनताई कुल, प्रा. शिवाजी काळुंगे, मल्लिनाथ कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, पंडित पाटील, मल्लिकार्जुन पाटील, डॉ. काशिनाथ उटगे, प्रभाकर हंजगे, मल्लिनाथ खददे, डॉ. शैलेश पाटील, इसहाक पटेल,मनोज इंगुले, विजयकुमार हुल्ले, के.बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. ते म्हणाले,आम्ही लहानपणापासून रविकांत अण्णांकडे ज्येष्ठ व्यक्ती व मार्गदर्शक या भूमिकेत पाहतो. त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कारखानदारीच्या क्षेत्रात कार्यकारी संचालक म्हणून अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले असून, त्याला त्यांची निस्वार्थी भावना कारणीभूत आहे. पी. वाय. पाटील सरांनी ज्या पद्धतीने कार्य केले,त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने रविकांत पाटील पुढे नेत आहेत. तालुक्यात यामुळेच पाटील परिवाराला
स्वतंत्र स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे ते राजकारणापासून अलिप्त आहेत, आणि त्यांच्या या वेगळ्या कामाची छाप सर्व स्तरातून दिसून येते.

सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी म्हणाले,रविकांत पाटील यांच्या पारदर्शी आणि तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्वाचा खरा पाया सिद्धेश्वर कारखान्यातच रचला
गेला. आज ते महाराष्ट्रातील आदर्श कार्यकारी संचालक म्हणून ओळखले जातात. पी. वाय. पाटील सर आणि काडादी परिवाराचे संबंध जुने आहेत. पाटील परिवार सुसंस्कृत
परिवार म्हणून ओळखला जातो. मी जेव्हा कारखान्यात स्वीकृत संचालक होतो, तेव्हा त्यांनी कृषी खात्यात शेती अधिकारी म्हणून कामास सुरुवात केली. कमी वयात त्यांनी या क्षेत्रात भरारी घेतली. आज कारखानदारी क्षेत्रात त्यांचे नाव आहे आणि वेगवेगळ्या मोठ्या कारखान्यांमध्ये ते कार्यरत आहेत. रवीकांत पाटील यांच्याकडे आपुलकी आणि आदर मोठा आहे. ते मोठे झाले तरी कोणाला विसरले नाहीत,असे सांगताना त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

आमदार राहुल कुल म्हणाले,कारखानदारीच्या क्षेत्रात कोणालाही न दुखावता कामे करून घेण्याची कला पाटील यांच्या रूपाने आम्हाला कळली. अत्यंत संयमी, शांत आणि हुशार व्यक्तिमत्व आहे. आमचा भीमा पाटस कारखाना बंद पडलेला असताना त्यांनी त्याला नवसंजीवनी दिली. त्यामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पुन्हा सुरू झाला. कारखानदारीशी संबंधित सर्व क्षेत्राशी त्यांचा संबंध चांगला असल्यामुळे त्यांना आज ‘आजारी कारखान्याचे डॉक्टर’ म्हणून ओळखले जाते. मागील चार वर्षांत त्यांनी अविरत परिश्रम करून भीमा पाटस कारखाना प्रगतीपथावर आणला, ही आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी गर्वाची गोष्ट आहे, असे सांगत आमदार कुल यांनी त्यांना ६१व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

 

 

 

लोकमंगलचे महेश देशमुख म्हणाले,लोकमंगलचे बीबीदारफळ,भंडारकवठे आणि लोहारा कारखाने सुरू करण्यामध्ये रविकांत पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले
आहे. मला ते गुरुस्थानी आहेत. विनम्रता आणि विश्वास हे त्यांचे दोन मोठे गुण आहेत. कारखानदारी क्षेत्रात काम करताना त्यांनी एकही पैशाचा अपहार केला नाही, तसेच त्यांच्या नावावर एकही काळा डाग नाही, असे कौतुक त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व ग्रंथप्रदर्शन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर रविकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी आरती पाटील यांचा समर्थ रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ देऊन व मानपत्र सादर करून सपत्नीक सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना रविकांत पाटील म्हणाले,कारखानदारी क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व स्व. अप्पासाहेब काडादी यांच्या मार्गदर्शनाखाली मी या क्षेत्रात सुरुवात केली. निष्ठेने काम करत असताना कोऱ्या चेकवर सही मिळण्याइतका विश्वास कमविला. धर्मराज काडादी यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच मी या क्षेत्रात प्रगती करू शकलो. सिद्धेश्वर कारखान्यामुळे माझी खरी ओळख निर्माण झाली. लोकमंगल ग्रुपमध्ये सतीश देशमुख, व्ही.पी.शुगर ग्रुपमध्ये व्ही. पी.पाटील आणि एमआरएन शुगर ग्रुपमध्ये मुर्गेश निराणी यांनी सदैव पाठिंबा दिला. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणूनही मी संस्थापक पदाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या तत्त्वांवरच वाटचाल करीत आहे. कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी, ऊसतोड कामगार, शेतकरी यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, असे ते म्हणाले.

यावेळी श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ व ग्रामीण विद्या विकास विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक संजय माने यांनी सत्कार केला.दुसऱ्या सत्रात प्रसिध्द वक्ते श्रीधर साळुंके व इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान झाले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी, काँग्रेस तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, माजी जि.प. सदस्य आनंद तानवडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, माजी सरपंच उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, अभिजित पाटील,सतीश दरेकर,सुरेश गड्डी, अंबणप्पा भंगे, प्रा.भीमाशंकर बिराजदार, गुरुनाथ दोडडयाळे, बसवराज बंडगर, नंदकुमार पाटील, सिद्धाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगाव, रियाज पटेल, संजय बाणेगाव, महादेव वाले, शोएब पटेल, चिदानंद हिरेमठ, दयानंद फताटे, खंडप्पा वाले, सोमनाथ बाणेगाव, ब्रम्हानंद म्हमाणे, तसेच साखर उद्योगातील मान्यवर, शैक्षणिक संस्था प्रमुख, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि पाटील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद जोशी यांनी केले. मानपत्र वाचन नितीन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ओमकार पाटील यांनी मानले. कार्यक्रमानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी केली होती.

 

ग्रामस्थांकडून मानपत्र व ‘स्वयंशिल्पी’ गौरवग्रंथाचे प्रकाशन

यावेळी रविकांत पाटील यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘स्वयंशिल्पी’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात पाटील यांनी आपल्या वजना एवढी म्हणजे १ लाख १० हजार रुपये किंमतीची पुस्तके प्रशालेस भेट दिली. तसेच प्रशालेतील अकराशे विद्यार्थ्यांना वार्षिक पंचवीस हजार रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण योजना जाहीर केली. चपळगाव ग्रामस्थांच्यावतीने प्रा. श्रीधर साळुंखे आणि सरपंच वर्षा भंडारकवठे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!