---Advertisement---

मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास कॉंग्रेसचा नकार ?

By team
On: October 16, 2025 4:47 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकीसाठी महायुती होण्याची शक्यता नसताना आता राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत असल्याचे चित्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्यावर कथितपणे नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी चांगलेच नाराज झालेत. त्यामुळे या प्रकरणाचे राजकारण पुढील काही दिवसांत चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा कळसाला पोहोचली आहे. हे दोन्ही बंधू मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेत. त्यानंतर आता ते मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही संयुक्तपणे सामोरे जाण्याची शक्यता आहे. पण आता ठाकरे गटाकून राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केल्याचा दावा केला जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे थेट दिल्ली स्थित काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे.

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

उल्लेखनीय बाब म्हणजे मनसे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवार व बुधवार असे सलग 2 दिवस राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. विरोधकांच्या या शिष्टमंडळात सुरुवातीला हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव होते. पण ऐनवेळी त्यांना दिल्लीला जावे लागल्यामुळे त्यांना या शिष्टमंडळासोबत जाता आले नाही. पण आता त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागे संजय राऊत यांचे पत्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण सपकाळ यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. ते या घटनाक्रमाविषयी बोलताना म्हणाले, निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी गेलेले शिष्टमंडळ हे मनसेला सोबत घेण्यासंदर्भात नव्हते. हे शिष्टमंडळ निवडणुकीतील घोटाळ्याविषयी निवडणूक आयोगाला भेटले. त्यात आघाडी किंवा युतीच्या चर्चा होण्याचा प्रश्नच नाही.

काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आमचे लोक त्यात सहभागी झाले होते. मी सुद्धा या शिष्टमंडळासोबत जाणार होतो. पण मला ऐनवेळी दिल्लीतून बोलावणे आल्यामुळे मला तिकडे जावे लागले. मी पक्षाच्या कामासाठी दिल्लीला गेलो. आमचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाच्या मुद्यावर आपली विस्तृत भूमिका जाहीर केली आहे. आत्ता कुणाला आघाडीत घ्यायचे किंवा कुणाला घ्यायचे नाही याचा निर्णय दिल्लीत होईल. संजय राऊत आमच्या इंडिया आघाडीचे नेते आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधण्यास मला कोणतीही समस्या नाही. मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देईन, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर आतापर्यंत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मूळात त्यांचे राजकारणच त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीत घेतले तर आपले हिंदी भाषिक मतदार दूर जातील अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. त्यातच संजय राऊत यांनी या प्रकरणी थेट हायकमांडकडे तक्रार केल्यामुळे काँग्रेसचे राज्यातील नेते नाराज झाल्याची माहिती आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!