ध्यास विश्वसार्ह बातमीचा

’चार दिवस सासूचे असतात, तर चार दिवस सुनेचे‌’ ; अजित पवारांनी दिला इशारा !

दौंड : वृत्तसंस्था

दौंड शहर हे मिनी भारत आहे. येथे सर्व जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. शहर दोन भागांमध्ये विभागले असले, तरी इथली एकजूट मोठी आहे. सत्तेचा अहंकार न ठेवता लोकांची कामे प्रामाणिकपणे करावी, ‌’चार दिवस सासूचे असतात, तर चार दिवस सुनेचे‌’, त्यामुळे राजकारणात कोणीही माज करू नये, अशा शब्दांत सज्जड दम उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला.

दौंड येथे शुक्रवारी (दि. 17) दौंड शहर भाजपचे माजी अध्यक्ष स्वप्निल शहा यांच्यासह नंदूभाऊ पवार आणि मनोज फडतरे तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळा प्रसंगी पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार रमेश थोरात, वीरधवल जगदाळे, प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे आदी उपस्थित होते.

या वेळी पवार यांनी जाहीर सभेत जनतेशी संवाद साधला. या भाषणात त्यांनी दौंडच्या सामाजिक रचनेपासून ते विकासकामांपर्यंत विविध मुद्द्‌‍यांवर परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आजच्या काळात बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, वशिला नव्हे. बँकेच्या भरतीमध्ये याचे उत्तम उदाहरण दिसते. सर्वांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यावर भर द्यावा.

शेतकऱ्यांच्या ऊस प्रश्नाबाबत ते म्हणाले की, कोणत्याही दबावाला घाबरू नका, तुमच्यासाठी मी ठामपणे उभा आहे. पोलिसांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी स्पष्ट केले की, कोणताही गुन्हा दाखल करताना पोलिसांनी योग्य शहानिशा करावी. चुकीचे वर्तन सहन केले जाणार नाही, मग तो माझा जवळचा असो वा कुणीही.

दौंडच्या विकासासाठी निधी दिला जातो. मात्र, पैसा दिला म्हणजे कामे होतातच, असे नाही, ती योग्यरीतीने पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. ‌’बारामती झकास आणि दौंड भकास‌’ असं म्हणणाऱ्यांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, दौंडकरिता भरपूर निधी दिला आहे, कामाची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांची आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना सावध केले की, ‌’रात्री एकासोबत आणि सकाळी दुसऱ्यासोबत‌’ अशी भूमिका चालणार नाही. निष्ठा ठेवून काम करा. या वेळी स्वप्निल शहा यांनी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालय दौंडला व्हावे, अशी मागणी केली असता, अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एक जागा अंतिम केली आहे, लवकरच तिथे मोठे महाविद्यालय उभे केले जाईल. मी शब्दाचा पक्का आहे. सर्व सोंगे करता येतात; पण पैशाचे सोंग करता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या निर्णयक्षमतेचा पुनरुच्चार केला. यावेळी अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन केले असता शहा यांनी 1 लाख 11 हजार 555 रुपयांचा धनादेश अजित पवार यांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!