---Advertisement---

भाऊबीजेच्या मुहूर्तावर मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा !

By team
On: October 23, 2025 3:18 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात मराठा आरक्षणासाठी रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीनंतरही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याने, जरांगे पाटलांनी थेट भाऊबीजेच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली, तर नदीकाठच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने जाहीर केलेल्या 3 हजार कोटींच्या मदत पॅकेजचा लाभ अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटलांनी थेट शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ‘नांगर’ टाकण्याची घोषणा केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी अधिकारीच सरकारपेक्षा मोठे झाले आहेत. जे काम करत नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. दिलेली मदत ही तात्पुरता आनंद आहे, जसा देवेंद्र फडणवीस प्रत्येकाला तात्पुरता आनंद देतात,” अशा शब्दांत त्यांनी मदतीच्या पॅकेजवर टीका केली. ते पुढे म्हणाले की, भाऊबीजेच्या दिवशी नुकसानीच्या याद्या तयार करत आहोत आणि लवकरच बैठक घेऊन राज्यात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभारले जाईल. शेतकऱ्यांसाठी काम करणारे अभ्यासक, तज्ज्ञ आणि नेते यांना एकत्र बोलावून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.

सत्ताधारी आमदारांना विकास निधी म्हणून हजारो कोटींची खिरापत वाटली जात असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला धारेवर धरले. “आमदारांकडे हजारो कोटींच्या प्रॉपर्ट्या आहेत, तरी त्यांना ५ कोटी देण्यात येत आहेत. भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला आणि लाडक्या दाजीला न्याय दिल्याशिवाय शांत बसायचे नाही,” असे ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी हमीभाव, कर्जमुक्ती, कुटुंबातील सदस्यांना नोकऱ्या आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करण्यासाठी हे ऐतिहासिक आंदोलन उभे करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

आरक्षण आणि जीआरच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी फडणवीस आणि सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला. “ओबीसींना म्हणायचे तुमच्या आरक्षणाला हात लागला नाही आणि इकडे आम्हाला जीआर द्यायचा, पण प्रमाणपत्र द्यायचे नाहीत. जर आमचा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही, तर तुमचा सुद्धा जीआर संविधानापेक्षा मोठा नाही हे लक्षात घ्या,” असा स्पष्ट इशारा देत, मराठा आरक्षणाच्या जीआरला धक्का लागल्यास आंदोलन कोणत्याही दिशेला जाऊ शकते, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!