मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये आंदोलन छेडले होते. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीची इनसाईड स्टोरी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उघड केली आहे. कर्जमाफीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस प्रचंड चिडचिड करत होते आणि मोठी खडाजंगी झाल्याचा खुलासा रविकांत तुपकर यांनी केला. बच्चू कडूंच्या नागपूरमधील आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि इतर मागण्यांवर 30 जूनपर्यंत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे कडू यांच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र आहे. तत्पूर्वी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी खुलासा केला.
रविकांत तुपकर म्हणाले की, सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस चिडचिड करत होते आणि तिथे मोठी खडाजंगी झाली. सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर आणि ३० जूनच्या आश्वासनावर आपण समाधानी नाही, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या आंदोलनात सर्व शेतकरी नेत्यांनी एका किमान कार्यक्रमावर (कॉमन मिनिमम प्रोग्राम) आपली एकजूट दाखवली, जी आगामी काळातही कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत ‘मंत्र्यांना कापा’ या त्यांच्या वक्तव्याचा विषय निघाला. यावर बोलताना तुपकर यांनी सांगितले की, सरकारमधील लोकांनी मला तुम्ही जर मंत्री झालात तर कुणाला कापाल? असा प्रश्न विचारला. त्यावर ‘आमदार मंत्र्यांना कापा’ या माझ्या वक्तव्याचा मला अजिबात पश्चात्ताप नाही आणि मी आजही या वक्तव्यावर ठाम आहे. जर सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केले नाही, तर आगामी काळात तसे घडू शकते, असा स्पष्ट इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला.
दरम्यान, बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नागपूर आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनपर्यंत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं असलं, तरी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीतील खडाजंगी आणि तुपकरांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील शेतकरी चळवळ नव्या टप्प्यात प्रवेश करण्याची चिन्हे दिसत आहेत.