मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात महायुती सरकार स्थापन झाले असून यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार व एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदी विराजमान होवून सरकार चालवीत आहे मात्र नेहमीच अजित पवार मुख्यमंत्री व्हावे यासाठी कार्यकर्ते फलकबाजी लावून चर्चेत येत असतात आता देखील आगामी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी शासकीय महापूजा करावी, असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाला घातले आहे. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात मोठ्या पदावर जाण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. अमोल मिटकरींच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सत्तासमीकरणांवर नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
कार्तिकी एकादशीनिमित्त अमोल मिटकरी यांच्या अकोल्यातील निवासस्थानी भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी संत नामदेव यांचा “विठ्ठलाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी” हा अभंग गायला. याच अभंगाचा संदर्भ घेत अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हेच आमच्यासाठी ‘विठ्ठलाचे राज्य’ असेल. आमचा नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावा, ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची तीव्र इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.
येत्या आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी, अशी प्रार्थना अमोल मिटकरी यांनी पांडुरंगाकडे केली. माझ्या प्रार्थनेला लवकरच यश येईल हा विश्वास मला आहे, असेही ते म्हणालेत. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हेच आमच्यासाठी विठ्ठलाचे राज्य असेल. आमचा नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर असावा, ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी आपण २०२९ पर्यंत राज्यातच थांबणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावर भाष्य करताना मिटकरी म्हणाले की, जर अजितदादा मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात आणखी मोठ्या पदावर जावे. फडणवीसांची लोकप्रियता देशात किती आहे, हे बिहारच्या निवडणुकीत दिसले आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रातील मोठ्या पदासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसतानाच मिटकरींचं हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.