ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात शिंदे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’ : आमदाराच्या भावालाच लावले गाळाला !

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी भाजपकडून महायुतीमधील मित्र पक्ष व महावीकस आघाडीला धक्का देत असताना आता सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केले आहे. या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत शिंदे गटाने थेट भाजपच्या आमदाराच्या भावालाच आपल्याकडे खेचले आहे. या राजकीय घडामोडींमुळे आता सोलापूर जिल्ह्यात भाजप विरुद्ध शिंदे सेना असे नवी राजकीय समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकी एकादशीच्या पूजेसाठी पंढरपूरला येताना ‘ऑपरेशन टायगर’ला मोठी ताकद दिली. सायंकाळी सोलापूरहून पंढरपूरकडे येत असताना, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवेढा मार्गे प्रवास केला. मंगळवेढ्यात त्यांनी भाजपचे आमदार समाधान आवताडे यांचे चुलते बबनराव आवताडे आणि चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांचा सत्कार स्वीकारला.

या भेटीदरम्यान, भाजप आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हेदेखील विशेषत्वाने उपस्थित होते. आवताडे कुटुंबातील सदस्यांना गळाला लावून आणि प्रतिस्पर्धी नेत्याला सोबत ठेवून, एकनाथ शिंदे यांनी सोलापूरच्या राजकारणात भाजपला थेट आव्हान देण्याची तयारी केली असल्याचे यातून स्पष्ट होते. भाजप आमदार समाधान आवताडेंचे चुलते असलेले बबनराव आवताडे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष आहेत, तर त्यांचे पुत्र मंगळवेढा खरेदी-विक्री संघाचे सभापती आहेत. मंगळवेढामध्ये आवताडे बाप-लेकाची फार मोठी ताकद असल्याने, थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार स्वीकारल्यामुळे आता लवकरच त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऑपरेशन लोटसचा धडाका सुरू केला असताना, त्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे. मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याची चर्चा आहे, आणि आवताडे यांच्यासोबत सामंत यांच्या बैठका झाल्याची माहिती समोर येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, आवताडे यांच्या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांच्याकडून मात्र शिवसेना प्रवेशाबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!