मोठी बातमी : भाजप सोलापूर पूर्व जिल्हा कार्यकारिणी जाहीर ; वाचा कुणाला मिळाली संधी !
विकास वाघमारे यांना पुन्हा सरचिटणीसपदाची संधी
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी अखेर सोलापूर पूर्व जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली आहे. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तब्बल चार महिन्यांपासून प्रतीक्षित असलेली ही कार्यकारिणी आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.
संघटनात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा सरचिटणीसपदी मोहोळचे तरुण नेतृत्व विकास वाघमारे यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. तसेच अक्कलकोटमधून प्रदीप पाटील आणि मंगळवेढ्यातून संतोष मोगले यांना सरचिटणीसपदी संधी देण्यात आली आहे. घोषित कार्यकारिणीत ९ उपाध्यक्ष, ८ चिटणीस, १ कोशाध्यक्ष आणि ६२ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटचे महेश बिराजदार, तर ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी उत्तर सोलापूरचे विनायक सुतार यांची निवड करण्यात आली आहे.



पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यकारिणी विशेष महत्त्वाची मानली जात आहे. माजी जिल्हाध्यक्ष आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यकाळातील सरचिटणीस विकास वाघमारे हे एकमेव पुनर्नियुक्त झालेले पदाधिकारी आहेत. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले, “आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवणार आहे. या नव्या कार्यकारिणीतील सर्व शिलेदार पक्षाचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवतील,” असे ते म्हणाले.