मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून विरोधक मतदार यादीत घोळ असल्याचे सांगून राजकारण तापवित आहे. त्यात आता राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भर पडली आहे. त्यांनी राज्यातील काही मतदान केंद्रांवर भाजपला 1 व काँग्रेसला 500 मते पडत असल्याचे नमूद करत संपूर्ण मतदार याद्याच स्क्रॅप करण्याची गरज व्यक्त केली आहे.
महाविकास आघाडी व मनसेने गत शनिवारी मतदार याद्यांतील कथित घोळाविरोधात मुंबईत मोर्चा काढला होता. त्यांनी मतदार याद्या स्वच्छ केल्यानंतरच राज्यात निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारयाद्या स्क्रॅप करण्याची गरज व्यक्त केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेची निवडणूकी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेण्याची गरज होती. आमच्या जागा निवडून आल्या असल्या तरी मतदार यादी चुकलेली आहे. मतदार यादीत अनेक ठिकाणी दुबार, तिबार नावे आहेत अशी तक्रार त्यांनी करणे अपेक्षित होते. पण या प्रकरणी पहिला आक्षेप विरोधकांनी नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवला. त्यांनी हायकोर्टात पहिली याचिका दाखल केली. त्यानंतर मी, आशिष शेलार व किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यात मतदार यादीत डिलिशन नव्हे तर केवळ ॲडिशन होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कामठी, मालेगाव, सिल्लोड आदी अनेक मतदारसंघांत एकाच व्यक्तीचे नाव चार-चार, पाच-पाच वेळा आले आहे. विरोधकांनी केवळ हिंदू मतदारांच्या नावांवर आक्षेप घेतला. पण अनेक बुथवर मुस्लिम मतदारांचीही एकाहून अनेकवेळा नावे आली आहेत. या भागात भाजपला 1 मत, तर काँग्रेसला 500 मते मिळाली आहेत. ज्या भागात मुस्लिम मतदार वाढले, तेथील मतदारयाद्यांत दुबार, तिबार नावे येत आहेत. तिथे विरोधक आक्षेप घेत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्वच मतदारयाद्या स्क्रॅप करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.