---Advertisement---

राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ; ‘सत्ताधाऱ्यांना भीती की राज ठाकरेंना?’ : वडेट्टीवारांचा सवाल

By team
On: November 10, 2025 4:16 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. मुंबईतील त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असून, दर दोन तासांनी पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. मात्र, या सुरक्षावाढीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी पुनरावलोकन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळते. स्थानिक पोलिसांकडून शिवतीर्थ परिसरात दिवसरात्र गस्त सुरू असून, सुरक्षा अधिकाऱ्यांकडून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केल्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “राज ठाकरे यांना भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली की सत्ताधाऱ्यांनाच भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले, “कोणाला सुरक्षा द्यायची, वाढवायची किंवा कमी करायची, याचा निर्णय एका समितीद्वारे घेतला जातो. त्या समितीच्या अहवालानुसारच राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असावी.”

राज्यात व्हीआयपी सुरक्षा देणे, कमी करणे किंवा रद्द करणे हे गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येते. संभाव्य धोक्याच्या आधारे सुरक्षा दर्जा निश्चित केला जातो. या संदर्भातील सर्व माहिती ‘यलो बुक’ या गोपनीय दस्तऐवजात नोंदवली जाते. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, तसेच काही महत्त्वाचे नेते यांना झेड+ सुरक्षा दिली जाते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!