मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुतीमध्ये मंत्र्यांसह आमदारांचे अनेक धक्कादायक प्रकरण बाहेर येत असताना आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल, असा दावा काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवार भूखंड घोटाळ्यात अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारबाहेर पडण्याचा इशारा दिल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी वरील दावा केला आहे. ते म्हणाले, पुण्यातील जमीन घोटाळ्यात पार्थ पवार जबाबदार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा घोटाळा बाहेर काढून भाजपने या प्रकरणी अजित पवार व त्यांच्या पक्षाची कोंडी केली आहे. या माध्यमातून आगामी निवडणुकीत पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपपुरक भूमिका घ्यावी असा डाव आहे. भविष्यात महायुतीत सर्वात पहिला आघात अजित पवारांच्या पक्षावर केला जाईल. त्यानंतर त्यांच्यावर स्वतःहून सरकार बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल.
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, स्थानिकच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट ठेवण्यात आली आहे. उमदेवारी अर्ज 20 पानांचा आहे. हा अर्ज ऑनलाईन भरताना विविध अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे हे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारण्याची मागणी केली आहे.
आयोगाने अर्जात उमेदवारांना मागील निवडणुकीत किती मते मिळाली, संबंधिताने किती खर्च केला आदी माहितीही मागवली आहे. प्रत्यक्षात ही माहिती आयोगाकडेही उपलब्ध आहे. ती पुन्हा मागवण्याची काहीच गरज नाही. शेवटच्या क्षणी विरोधकांचे अर्ज स्वीकारले नाहीत अशी स्थिती निर्माण केली जाण्याची शक्यता आहे.