मुंबई : वृत्तसंस्था
उत्तर भारतातील हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू–काश्मीरमध्ये वाढलेल्या थंडीचा प्रभाव आता महाराष्ट्रातही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागातील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात हिवाळ्याची चाहूल जोरदार जाणवत असून, पहाटे थंडगार हवा तर दिवसा उन्हाचा चटका असे दोन्ही टोकांचे हवामान अनुभवायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरातही सकाळी गारठा आणि दुपारी उष्णता अशी परिस्थिती कायम आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात सध्या थंडीने विक्राळ रुप धारण केले आहे. जळगावात दोन दिवसांपूर्वी तापमान ९ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते, तर सध्या ते ११ अंशांवर नोंदले जात आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांना पहाटे आणि रात्री विशेष त्रास सहन करावा लागत आहे. शहर व ग्रामीण भागात शेकोट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. धुळे जिल्ह्यात तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता असून सध्या ८ अंशांवर असलेले तापमान ५ अंशांवर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे धुळे हा राज्यातील सर्वाधिक थंड जिल्हा ठरण्याची शक्यता वाढली आहे.
थंडीच्या कडाक्यामुळे जनजीवनावर परिणाम होत असून सकाळी धुक्याची चादर पसरत आहे. दृश्यमानतेत घट झाल्याने वाहतूक मंदावते आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास होत असल्याने अनेक पालकांनी शाळा सुरू होण्याची वेळ उशिरा करावी, अशी मागणी केली आहे. मात्र, अद्याप शिक्षण विभागाकडून या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सकाळी व्यायाम करणारे नागरिक, शेतकरी आणि कामानिमित्त बाहेर पडणारे कामगार एवढेच रस्त्यावर दिसत असून सर्वसामान्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.
हिमाचल, काश्मीर खोरे, गुलमर्ग, पहलगाम आणि श्रीनगर येथे तापमान शून्याखाली गेले आहे. सुरू असलेल्या हिमवर्षावामुळे स्थानिकांच्या हालचाली मर्यादित झाल्या आहेत; तर पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरत आहे. १६ नोव्हेंबरनंतर नव्या पश्चिमी झंझावाताचा इशारा देण्यात आला असून हिमवर्षाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दुसरीकडे केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि अंदमान–निकोबार येथे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये थंडीबरोबरच पाऊसही राहू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात यंदाचा हिवाळा मागील काही वर्षांच्या तुलनेत अधिक तीव्र जाणवत आहे. पुढील आठवड्यात तापमान आणखी खाली येण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान ८ ते १० अंशांखाली जाण्याचा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी, विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि विद्यार्थ्यांनी गरम कपड्यांचा योग्य वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात पुढील काही दिवस सकाळ–संध्याकाळच्या वेळी थंडीचा कडाका वाढणार असून हिवाळा आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.