---Advertisement---

जनतेने जंगलराज नाकारले ; उपमुख्यमंत्री शिंदे !

By team
On: November 14, 2025 5:15 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाबद्दल महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. लाडक्या बहिणींनी हिरीरीने मतदान केल्यामुळेच बिहारमध्ये एनडीएचा लँडस्लाईड विजय झाला, असे ते म्हणालेत. बिहारच्या जनतेने या जनादेशामुळे लालूंचे जंगलराज नाकारल्याचेही ते यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा विजय खरोखर ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत राजद व काँग्रेसच्या महाआघाडीचा पार धु्व्वा उडाला आहे. तर सत्ताधारी एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएचे सरकार सलग पाचव्यांदा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनडीएच्या या विजयात बिहारमधील महिलांना निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या करण्यात आलेल्या मदतीचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याची पुष्टी केली आहे. लाडक्या बहिणींमु्ळेच बिहारमध्ये भाजपला दैदिप्यमान विजय मिळाल्याचे ते म्हणालेत.

एकनाथ शिंदे म्हणाले, बिहारमध्ये एनडीएचा मोठा विजय झाला. तेथील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेल्या विकासावर विश्वास ठेवला. त्यामुळे मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. एवढेच नाही तर मी लाडक्या बहिणींचेही अभिनंदन करतो. कारण, लाडक्या बहिणींनी तिथे मोठ्या प्रमाणात मतदान केले. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचे मतदान वाढल्यामुळे लँडस्लाईड व्हिक्ट्री मिळाली. तशीच लँडस्लाईड व्हिक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींमुळे मिळाली. बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारले आणि विकासराज स्वीकारले. त्यामुळे एनडीएला अशा प्रकारचा विजय मिळाला.

शिंदे म्हणाले, पूर्वी लोक घोषणा द्यायचे की, जब तक रहेगा समोसे में आलू, तब तक बिहारमध्ये रहेगा लालू. पण आता असे झाले आहे की, जब तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज चालू. बिहारच्या लाडक्या बहिणींनी विकासाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे तिथे विकासाची राजवटच सुरू राहील. लोकांनी लालूंचे जंगलराज नाकारले. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचे सरकार होते तेव्हा जनतेची सायंकाळी 6 वाजेनंतर रस्त्यावर फिरण्याची हिंमत होत नव्हती. व्यापारी आपली दुकाने बंद करत होते. मी बिहारमध्ये प्रचाराला गेलो तेव्हा लोक तेथील जंगलराजविषयी सांगत होते. तिथे दिवसाढवळ्या हत्या, लूट व बलात्कार होत होते. पण नितीशकुमार यांच्या काळात हे सर्व चित्र बदलले. त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!