मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या “आपल्याला कोणत्याही स्थितीत 2 डिसेंबरपर्यंत महायुती टिकवायची आहे” या विधानानंतर, आता भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यामुळे या तणावाला अधिक हवा मिळाली आहे.
मालवणमध्ये भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरी शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी घातलेल्या धाडीप्रकरणी राणे यांनी BJP वर मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप केला होता. पत्रकारांनी या संदर्भात प्रतिक्रिया विचारल्यावर रवींद्र चव्हाण यांनी, “मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, त्यानंतर नीलेश राणेंना उत्तर देईन. पण त्यांचे आरोप खोटे आहेत,” असे सांगत अधिक बोलणे टाळले.
या विधानावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, महायुतीतील मित्रपक्षांनी एकमेकांविषयी बोलताना संयम राखावा. “दोन्ही पक्षांची केंद्र आणि राज्यात युती आहे. आचारसंहितेचे भान ठेवणे आवश्यक आहे,” असा सल्ला त्यांनी दिला.
दरम्यान, मंत्री गणेश नाईक यांनीही या वादावर सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. “रवींद्र चव्हाण चुकून बोलले असतील, त्याला गांभीर्याने घेऊ नये. पण उद्या आम्हाला ढकलणार असाल तर पुढे कोण कुणाला ढकलते ते पाहू,” असे म्हणत त्यांनी महायुतीत सर्वकाही सुरळीत नसल्याचे संकेत दिले.
2 डिसेंबरच्या मुदतीवरून वाढलेल्या या राजकीय वक्तव्यांच्या मालिका पाहता, महायुतीत खरोखरच फूट पडणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.