नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून मनपा प्रशासन व पर्यावरण प्रेमी यांच्यामध्ये नाशिक शहरात मोठा वाद सुरू असून आता तपाेवनात साधूग्रामसाठी 1800 वृक्षताेडीची तयारी महापालिकेने केल्याने पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमींनी आंदाेलन उभे केले आहे. यावर मात्र शुक्रवारी (दि. 28) महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी येथील एकही झाड ताेडले जाणार नसून केवळ 5 ते 7 वर्षांत वाढलेली झुडपे काढली जाणार असल्याचे विधान करतानाच काही लाेक दिशाभूल करत असल्याचेही व्यक्त केले.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज तपोवनात पाहणी दौरा केला यावेळी बोलताना ते म्हणाले की, तपोवनमधील एकही झाड तुटता कामा नये. ही झाडं गेली तर नाशिककरांचे खूप मोठे नुकसान होईल. तपोवनमधील झाडे तोडू नये यासाठी सर्व नाशिकरांनी या वृक्ष तोडीचा विरोध केला पाहिजे. सरकारने आम्हाला फसवू नये. माझी कुणाशी काही दुश्मनी नाही वृक्ष तोड थांबवण्यासाठी झाली तरी काही हरकत नाही. जगात झाड हाच सेलिब्रिटी आहे. जो आपल्याला जगवतो तो सेलिब्रिटी असतो. झाडं तोडली तर कुणालाच माफी नाही. झाडांवर फुल्यावगैरे मारण्याची चेष्टा करु नका. भारत सरकारनेच सर्वात जास्त वडाची झाडे तोडली.
यावर संतप्त पर्यावरणप्रेमींनी मात्र झुडुपे 6 ते 10 मीटरपर्यंत असतात. येथील ही झाडे गगनाला भिडली आहेत. त्यामुळे या झाडांना आयुक्त झुडूप म्हणत असतील तर त्यांचे विधान अनाकलनीय असल्याची उद्विग्नता व्यक्त केली आहे. दरम्यान, सर्वेक्षणावेळी झाडांवर मारलेल्या पिवळ्या फुल्यांवर आता डी-मार्किंगच्या हिरव्या फुल्या मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.