---Advertisement---

पालकमंत्री गोरेंची जोरदार फटकेबाजी : तिजोरी, चाव्या नव्हे तर बँकच आमच्याकडे आहे !

By team
On: November 29, 2025 10:37 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था 

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बड्या नेत्यांकडून जोरदार भाषणबाजी केली जात आहे. स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असल्याने महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. राज्यात महायुती सत्तेत असली तरी, स्थानिक निवडणुकीत विरोधात असे उलट चित्र पाहायला मिळत आहे. सध्या तिजोरीच्या चाव्यावरून राजकारण चांगलेच रंगल्याचे दिसत आहे. आता यात भाजपचे मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याची भर पडली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे आयोजित सभेत जयकुमार गोरेंनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली. तिजोरीच्या चाव्यावरून रंगलेल्या राजकारणात त्यांनी भाष्य केले. “इथे येऊन कोण म्हणतं तिजोरी आमच्याकडे आहे, तर कोण म्हणतं चावी आमच्याकडे आहे. पण बँकच आमच्याकडे आहे. मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार” अशा शब्दांत जयकुमार गोरेंनी मित्रपक्षालाच टोला लगावला आहे.

अवघ्या काही दिवसांवर नगरपरिषदा नगरपंचायतींसाठीच्या मतदानाचा दिवस येऊन ठेपलेला आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना यांच्यात स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर प्रचार सभेतून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील आपल्या उमेदवारांना बळ देण्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला मतदान करा नगरविकास खाते आपल्याकडे आहे, विकास करू, असे आवाहन करत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, त्यामुळे निधी देणे माझ्या हातात असल्याचे सांगत आहेत.

“राज्यातील प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्याच्या सहीने मंजूर होत असतो. कदाचित हे लोक विसरलीत,” असा शब्दांत त्यांनी मित्रपक्षावर निशाणा साधला आहे. आजवर करमाळ्यात यांनी कायमचे ठरवले होते. तुम्ही नाही तर आम्ही. पण मध्येच भाजप आल्याने त्यांचे वांदे झाले. एकदा भाजपकडे सत्ता देऊन बघा, असे आवाहन जयकुमार गोरेंनी केले आहे.

भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात करमाळा नगरपालिका दिल्यास मी पालकमंत्री म्हणून दत्तक घेतो, असा शब्द जयकुमार गोरेंनी यावेळी बोलताना दिला. यावेळी त्यांनी ग्रामदैवत कमलाभवानी देवीची शपथ घेत हे विधान केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!