मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळावा होण्यापूर्वी मोठा वाद सुरु झाला आहे. या सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. मात्र, सरकारने असा एक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नाशिककर आणि पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. या कुंभमेळ्यात साधू-महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे, सरकारच्या या निर्णयावर पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त असून तीव्र विरोध दर्शवला आहे. यासाठी नागरिक, पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील वृक्षतोडीस विरोध दर्शवला असून झाडे आमचे आई वडील आहेत, हल्ला केला तर गप्प बसणार नाही, असा थेट इशारा सरकारला दिला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील वृक्षतोडण्यास विरोध केला असून, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील मैदानात उतरले आहेत. त्यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. साधूंच्या नावाखाली जमीन सपाट करुन उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारवर असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने 1800 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा, नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पोस्टमध्ये राज ठाकरे पुढे म्हणाले, बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो.
आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची! इतकाच विचार या सरकारचा असणार! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत, असेही राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेंनी सरकारला इशारा देत निर्णय रद्द केला नाही तर आपली भूमिका काय याबाबत सांगितले आहे. तसेच नाशिककरांनाही राज ठाकरेंनी आवाहन करत, तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील, असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकात वृक्षतोडीचा मुद्दा आणखी तापणार असल्याचे बोलले जात आहे.