नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात 0.25% कपात करून तो 5.25% केला आहे. मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी 5 डिसेंबर रोजी याबाबत घोषणा केली.
रेपो दर कमी झाल्यामुळे बँकांना स्वस्त कर्ज मिळणार असून पुढील काही दिवसांत गृहकर्ज, वाहन कर्जासह इतर कर्जेही स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे सध्याचे EMI देखील कमी होणार आहेत. 20 वर्षांच्या 20 लाखांच्या कर्जावरील EMI सुमारे 310 रुपयांनी कमी होईल, तर 30 लाखांच्या कर्जावरील EMI जवळपास 465 रुपयांनी कमी होईल. नवीन तसेच विद्यमान ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.
यावर्षी RBI ने चौथ्यांदा रेपो दरात कपात केली असून एकूण 1.25% नी दर कमी करण्यात आला आहे. फेब्रुवारी, एप्रिल आणि जूननंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये दरात कपात झाली आहे.
महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पॉलिसी रेटमध्ये वाढ–कपात केली जाते. महागाई जास्त असल्यास दर वाढवले जातात, तर अर्थव्यवस्था मंदावल्यास हे दर कमी केले जातात.
मॉनेटरी पॉलिसी कमिटीमध्ये एकूण 6 सदस्य असतात. त्यापैकी 3 सदस्य RBI चे तर इतर 3 केंद्र सरकार नियुक्त करते. RBI ची MPC बैठक दर दोन महिन्यांनी होते. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये अशा 6 बैठका आयोजित केल्या जाणार आहेत.