---Advertisement---

इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाला वेग ; एक वर्षात काम पूर्ण करण्याचा सरकारचा निर्धार !

By team
On: December 6, 2025 10:26 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

इंदू मिल परिसरात उभारण्यात येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक येत्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, स्मारकाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले असून सर्वात महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या पुतळ्याच्या उभारणीस आता वेग देण्यात आला आहे. पुतळ्याचा पाया जवळपास 100 फूट उंचीचा असणार असून त्यावर 350 फूट उंचीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभा राहणार आहे. “हा पुतळा मुंबईच्या आकाशरेषेला वेगळा ठसा उमटवेल,” असेही त्यांनी सांगितले.

स्मारक अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक रचना आणि उच्च गुणवत्तेसह उभारले जात असून पावसाळ्यापूर्वी पुतळ्याचे मुख्य स्ट्रक्चर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आर्थिक तरतूद, तांत्रिक साधने आणि सुरक्षा यांचा विचार करून बांधकामाला गती दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, “सामाजिक विषमतेतून समाजाला उभारी देत प्रत्येक नागरिकाला समान हक्क देणारे संविधान बाबासाहेबांनी दिले. हे स्मारक त्यांच्या विचारांची सतत आठवण करून देणारे प्रेरणास्थान ठरेल.”

स्मारकाचा अंतिम टप्पा काही महिन्यांत दिसू लागेल आणि पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पर्यटन यादीतही नव्या आकर्षणाची भर पडेल, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!