ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांचा राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यामुळे राज्यात ‘किंगमेकर’ ठरलेले मनोज जरांगे पाटील यांना आता थेट एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी जरांगे पाटील यांना आपल्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. एका बाजूला जरांगे यांना ऑफर देतानाच, दुसरीकडे करुणा मुंडे यांनी भाजपवर सडकून टीका करत पार्थ पवार प्रकरण आणि महायुतीतील राजकारणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या संघर्षामुळे हैदराबाद गॅझेट लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे म्हणाल्या, “मी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळीच जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले होते. मनोज जरांगे यांच्यासारख्या लढवय्या नेतृत्वाची आज महाराष्ट्रातील १८ पगड जातींना आणि सर्व समाजघटकांना गरज आहे. त्यामुळे त्यांनी स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी माझी त्यांना विनंती आहे आणि मी ते पद त्यांना द्यायला तयार आहे.”

यावेळी बोलताना करुणा मुंडे यांनी परळीच्या राजकारणावरही भाष्य केले. “धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे काय करत आहेत, हे जनता पाहत आहे. मात्र, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सायकलवरून फिरून ज्याप्रमाणे संघर्ष केला, तोच वारसा घेऊन मी एकटी महिला असूनही महाराष्ट्र पिंजून काढत आहे. त्यामुळे मुंडे साहेबांचा खरा राजकीय वारसा माझ्याकडेच आहे,” असा दावा त्यांनी केला. तसेच वाल्मीक कराड प्रकरणामुळे आमच्या घराण्याची आणि कुळाची बदनामी झाल्याचेही त्यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!