---Advertisement---

जनतेची फसवणूक अन हे ‘वांझोटे अधिवेशन’ ठरले ; महाविकास आघाडीचा हल्लाबोल !

By team
On: December 14, 2025 5:37 PM
Follow Us:
---Advertisement---

नागपूर : वृत्तसंस्था

येथे पार पडलेल्या सात दिवसांच्या हिवाळी अधिवेशनातून विदर्भातील जनता व शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले की, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी तिजोरीतील पैसा खर्च करण्यासाठीच हे अधिवेशन झाले. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी घोषणांचा पाऊस पडला; मात्र विदर्भासाठी एकही ठोस घोषणा झाली नाही. त्यामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक करणारे हे ‘वांझोटे अधिवेशन’ ठरले, असा आरोप त्यांनी केला.

सचिन अहिर यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले असतानाही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याची टीका केली. विदर्भातील धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अपेक्षेने अधिवेशनाकडे पाहत होते; मात्र बोनसच्या मागणीकडे सरकारने पाठ फिरवली, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. राज्यातील तरुण ड्रग्सच्या विळख्यात अडकत असताना सरकारकडून ठोस भूमिका मांडली गेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील म्हणाले की, अधिवेशनात घोषणांचा नुसता पाऊस पडला. कापूस खरेदी केंद्र वाढवण्याची मागणी करूनही निर्णय झाला नाही. ‘खिशात पैसे नाहीत पण घोषणा अपार’ अशी अवस्था महायुती सरकारची असल्याचा टोला त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारच्या गुंतवणूक दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक व एमओयू झाल्याची माहिती दिली; मात्र प्रत्यक्षात त्या कंपन्या राज्यात येत नाहीत, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही, असे त्यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेबाबत विचारलेल्या प्रश्नांवरही ठोस उत्तरे मिळाली नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

विरोधकांनी सभागृहात आक्रमकपणे प्रश्न उपस्थित केले; मात्र सत्ताधाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत, असे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी सांगितले. सात दिवसांच्या अधिवेशनानंतर जनतेच्या पदरी केवळ निराशाच पडली, असा एकमुखी निष्कर्ष विरोधी पक्षांनी काढला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!