ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या तोंडावर गोळीबार; भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला

अंबरनाथ प्रतिनिधी : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री गोळीबार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अंबरनाथमधील राजकीय वातावरण तापले आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील शंकर मंदिर परिसरात असलेले हे कार्यालय मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास लक्ष्य करण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अचानक कार्यालयासमोर थांबून ३ ते ४ राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकून बाहेर आलेल्या सुरक्षारक्षकावरही हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेचे थरारक दृश्य कार्यालयाबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी त्या आधारे तपासाला वेग दिला आहे. परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज, हल्लेखोरांची दुचाकी, तसेच त्यांच्या पळून जाण्याच्या मार्गाचा शोध घेतला जात आहे. मोबाईल लोकेशनच्या आधारेही तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, या गोळीबारामागे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. घटनेनंतर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंबरनाथ पोलिस ठाण्यात दाखल झाले आणि आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. संशयितांची नावे देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत नरेंद्र पवार, गुलाबराव करंजुळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. निवडणुकीच्या तोंडावर तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

विशेष म्हणजे, आज अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून, त्याच पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उमेदवाराच्या कार्यालयावर थेट गोळीबार होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, याचे पडसाद संपूर्ण राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पोलिस तपासातून काय निष्पन्न होते आणि आरोपींवर कधी कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!