हुपरी प्रतिनिधी : घराची वाटणी करून देण्यात यावी, या कारणावरून जन्मदात्या आई-वडिलांवर खुरपं, दगड व काठीने हल्ला करून, हाताची नस काचेने कापत अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हुपरी शहरात घडली. शहरातील महावीर नगर येथील अल्फालाईन गल्लीमध्ये आज (दि. १९) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेत विजयमाला नारायण भोसले (वय ७०) आणि नारायण गणपतराव भोसले (वय ७८) या वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मुलगा सुनील नारायण भोसले (वय ४८) याने खून केल्यानंतर स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर होऊन घडलेला प्रकार सांगितला आहे.
नारायण भोसले हे पत्नी विजयमाला व मुलगा सुनील यांच्यासह महावीर नगर परिसरात वास्तव्यास होते. त्यांना तीन मुले असून थोरले चंद्रकांत व संजय हे व्यवसायानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास आहेत. आरोपी सुनील याचे लग्न झाले असून, त्याच्या सततच्या त्रासामुळे पत्नी व मुले माहेरी बेळगाव येथे राहत आहेत. त्यामुळे तो आई-वडिलांसोबतच राहत होता.
गेल्या काही महिन्यांपासून घराची वाटणी करून मिळावी, यासाठी सुनीलचा आई-वडिलांशी सतत वाद सुरू होता. विविध कारणांमुळे घराची वाटणी शक्य नसल्याने आई-वडील त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. याच रागातून शुक्रवारी पहाटे वडील झोपेत असतानाच सुनीलने त्यांच्या डोक्यावर काठीने हल्ला केला. त्यानंतर दगडाने ठेचून खिडकीची काच फोडत त्यांच्या हाताची नस कापली.
दरम्यान, नळाला पाणी आल्याने आई विजयमाला बाहेर विद्युत मोटर सुरू करत होत्या. त्या घरात येताच सुनीलने त्यांच्यावरही हल्ला करून काचेने डोक्यात वर्मी घाव घातला व हाताची नस कापली. दोघांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, या घटनेनंतर सुनील हा निवांतपणे घराबाहेर येऊन मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या शेजाऱ्यांना हसतमुखाने ‘हाय-हॅलो’ करत वावरत होता, जणू काही घडलेच नाही असा त्याचा आविर्भाव होता. काही वेळानंतर तो स्वतःहून हुपरी पोलिसांत गेला व संपूर्ण घटनेची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. या अमानुष घटनेमुळे हुपरी शहरात हळहळ व्यक्त होत असून, घरगुती वादाचे भयावह परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.