सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यभरातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र दुसरीकडे निकालापूर्वीच मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीवर भाजपचंच कमळ फुललं आहे. अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व 17 सदस्य आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध जाहीर करण्यास आयोगाने मान्यता देण्यात आली आहे.
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्राजक्ता पाटील या मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या सून आहेत. अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असली तरी निवडणुकीच्या आधीपासून या ठिकाणी मोठा वाद झाला होता.
अनगर नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे. मात्र सुरूवातीपासून या नगरपंचायतीची निवडणूक गाजली. या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटे पाटील यांना एबी फॉर्म मिळाला होता. ज्यामुळे राजन पाटील यांनी उज्ज्वला थिटेंच्या मार्गात अडथळे आणत त्यांना दोन दिवस हा फॉर्म भरण्यापासून रोखले. पण पोलिसांच्या बंदोबस्तात १७ नोव्हेंबरला पहाटे पाच वाजता थिटे यांनी आपल्याला मुलाला सोबत घेत नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला. पण मंगळवारी झालेल्या छानणीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद करण्यात आला. तर अन्य एका अपक्ष उमेदवाराने आपला फॉर्म १९ नोव्हेंबरला मागे घेतला. ज्यामुळे प्राजक्ता पाटील आता अनगर नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष बिनविरोध नगराध्यक्ष बनल्या आहेत.