---Advertisement---

बांगलादेशात हिंदू कुटुंबाचे घर जाळले, भारतात संतापाचे निदर्शने !

By team
On: December 24, 2025 11:07 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली वृत्तसंस्था : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करून होणाऱ्या हिंसक घटनांची मालिका अद्याप थांबलेली नाही. ताज्या घटनेत चितगाव जिल्ह्यातील रौजन उपजिल्ह्यात एका हिंदू कुटुंबाच्या घराला अज्ञातांनी आग लावली. या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून पाळीव प्राणीही मृत्युमुखी पडले. हल्लेखोरांनी घरामागील कुंपण तोडल्याने कुटुंबीयांना जीव वाचवण्यासाठी पळ काढता आला.

घटनास्थळी सापडलेल्या धमकीच्या पोस्टरमुळे तणाव अधिकच वाढला आहे. या पोस्टरमध्ये हिंदू समुदायाला “मुस्लिम समुदायाविरुद्धच्या कारवाया थांबवण्यासाठी अंतिम इशारा” देण्यात आल्याचा उल्लेख आहे. १८ डिसेंबर रोजी मयमनसिंग येथे दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाचा जमावाकडून मारहाण करून जाळण्यात आलेल्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचाराचाच हा पुढचा भाग असल्याचे मानले जात आहे. त्या घटनेपासून बांगलादेशच्या अनेक भागांत तणावपूर्ण वातावरण असून अल्पसंख्याकांमध्ये भीती पसरली आहे.

दरम्यान, बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात मंगळवारी भारतातील अनेक शहरांमध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. दिल्लीमध्ये विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेश उच्चायुक्तालयाकडे कूच केले. कडक बंदोबस्त असतानाही काही निदर्शकांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांशी झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुमारे १,५०० पोलिस तैनात करण्यात आले आणि निदर्शकांना उच्चायुक्तालयापासून सुमारे ८०० मीटर अंतरावर रोखण्यात आले.

मुंबईतही बजरंग दल व विहिंपच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेश उपउच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी कफ परेड परिसरातून सुमारे ५० निदर्शकांना हटवून आझाद मैदानात नेले.

या पार्श्वभूमीवर बांगलादेश सरकारने भारतातील बांगलादेशी दूतावास व मिशनच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत ढाका येथील भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले आहेत. नवी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेरील घटना आणि सिलिगुडी व्हिसा सेंटरमधील तोडफोडीवर गंभीर चिंता असल्याचे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. अवघ्या १० दिवसांत भारतीय उच्चायुक्तांना समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ असून दोन्ही देशांतील तणाव अधिकच वाढताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!