ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बॉम्बस्फोटाने तरुणाचा जागीच मृत्यू, बांगलादेशात पुन्हा हिंसाचाराचे सावट

नवी दिल्ली वृत्तसंस्था : बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला असून राजधानी ढाक्यात झालेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. मोगबाजार परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या भीषण स्फोटात 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नाश्ता आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या या निष्पाप तरुणावर अचानक मृत्यू कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे 7.10 वाजता मोगबाजार फ्लायओव्हरवरून अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्यावर शक्तिशाली बॉम्ब फेकला. हा बॉम्ब थेट रस्त्याने जाणाऱ्या तरुणाच्या डोक्याला लागला आणि स्फोटात त्याचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. लोक भीतीने पळत सुटले, तर काहींनी जीव वाचवण्यासाठी लपण्याचा प्रयत्न केला.

मृत तरुण मोगबाजार परिसरातील एका ऑटोमोबाइल ॲक्सेसरीजच्या दुकानात काम करत होता. रोजच्या प्रमाणे तो कामावर जाण्यापूर्वी नाश्ता आणण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, या हिंसक घटनेने त्याचा जीव घेतला. रमना विभागाचे पोलीस उपायुक्त मसूद आलम यांनी सांगितले की, हा स्फोट ‘कॉकटेल बॉम्ब’मुळे झाला असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे हद्दपार नेते तारिक रहमान यांच्या संभाव्य ढाका आगमनाच्या पार्श्वभूमीवरच राजधानीत अशा घटना घडत असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय तणाव वाढत आहे. तारिक रहमान हे माजी राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान आणि माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे पुत्र असून गेल्या 15 वर्षांपासून ते निर्वासित जीवन जगत आहेत.

या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील अस्थिर परिस्थिती भारतासाठीही चिंतेचा विषय ठरत आहे. याआधी हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांनंतर भारतात निषेधाचे वातावरण पाहायला मिळाले होते. दिल्लीतील बांगलादेश दूतावासाबाहेर आंदोलनेही झाली होती. आता पुन्हा ढाक्यातील बॉम्बस्फोटामुळे बांगलादेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आगामी निवडणुकांच्या तोंडावर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!