---Advertisement---

कबुतरांना दाणा टाकणे महागात! व्यापाऱ्याला ठोठावला दंड; देशातील पहिली शिक्षा

By team
On: December 27, 2025 11:57 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा कठोर निर्णय घेतला होता. दादर येथील प्रसिद्ध कबुतरखान्यासह शहरातील इतर ठिकाणीही यावर कारवाई करण्यात आली. या निर्णयाला काही नागरिकांनी विरोध केला असून काहींनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

न्यायालयाच्या आदेशानंतरही दादर परिसरात काही नागरिकांकडून कबुतरांना दाणा टाकण्याचे प्रकार सुरूच होते. याच पार्श्वभूमीवर दादरमध्ये राहणारे व्यापारी नितीन शेठ यांच्याविरोधात पोलिसांनी कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी बंदी असतानाही कबुतरांना दाणा टाकल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत नितीन शेठ यांनी आपली चूक कबूल केली.

या प्रकरणी न्यायालयाने कडक भूमिका घेत नितीन शेठ यांना दोषी ठरवले. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी. वाय. मिसाळ यांनी सोमवारी दिलेल्या निकालात त्यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 (ब) अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. व्यापाऱ्याच्या कृतीमुळे लोकांच्या आरोग्य, जीवन आणि सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तसेच बीएनएसच्या कलम 271 अंतर्गत आरोग्याला घातक आजार पसरवण्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची कारवाई असून अशा स्वरूपाची ही देशातील पहिली शिक्षा असल्याचे सांगितले जात आहे. या निकालामुळे सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!