मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच मराठी महापौरपदाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, त्यातून राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि उत्तर भारतीय विकास सेनेमध्ये जोरदार शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय विकास सेनेने शिवसेना भवनासमोर वादग्रस्त बॅनर लावल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे, वरना बाटोगे तो पिटोगे असा मजकूर असलेला हा बॅनर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संदीप देशपांडे यांनी यापूर्वी “मराठीचा अपमान कराल तर नाही बटोगे, तरीही पिटोगे,” असे वक्तव्य केले होते.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मनसेवर टीकास्त्र सोडले. “जर उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री गोविंद पंत मराठी असू शकतात, तर मुंबईचा महापौर उत्तर भारतीय का असू शकत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “सध्या मनसेची उत्तर भारतीयांविरोधात नेट प्रॅक्टिस सुरू आहे; सत्ता आली तर सीझन क्रिकेट सुरू होईल,” अशी टीका करत भीती व्यक्त केली.
सुनील शुक्ला यांनी पुढे सांगितले की, “उत्तर भारतीय विकास सेना महानगरपालिका निवडणुकीत १०० मराठी उमेदवारांना तिकीट देणार आहे. आम्हाला कोणाची भीती नाही, आणि मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार,” असा दावा त्यांनी केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात येणारे असे वादग्रस्त बॅनर आणि तीव्र वक्तव्यांमुळे आगामी काळात मुंबईचे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.