---Advertisement---

सोलापूरात महाविकास आघाडीत खदखद; जागावाटपावरून वाद चव्हाट्यावर

By team
On: December 27, 2025 6:13 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर वृत्तसंस्था : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीही तयारीला वेग आला आहे. सोलापूर महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. भाजपला रोखण्यासाठी सोलापूरमध्ये महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्यानंतर जागावाटपही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच आघाडीतील अंतर्गत वाद उफाळून आले आहेत.

महाविकास आघाडीच्या जागावाटपानुसार काँग्रेस ४५, शिवसेना ठाकरे गट ३०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) २० आणि माकप ७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र, काँग्रेसला तुलनेने जास्त जागा मिळाल्याने शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उत्तर विधानसभा शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी शहरप्रमुख अजय दासरी यांना जाब विचारला. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी आणि नंतरही शिवसैनिकांनी कमी जागांबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी धाराशिवकर आणि दासरी यांच्यात शाब्दिक चकमक झाली असून, एकमेकांना ‘बघून घेण्याची’ भाषा केल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातही वाद झाल्याचे समोर आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर आणि ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांमध्ये तू-तू मैं-मैं झाली. यामुळे वरच्या पातळीवर ठाकरे बंधू एकत्र आलेले दिसत असले, तरी स्थानिक पातळीवर मतभेद उफाळून आल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते अजय दासरी म्हणाले की, भाजपविरोधात आणि सोलापूरच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत त्याग केला आहे. चारही पक्ष मिळून १०२ जागांवर निवडणूक लढवत असून मनसेही सोबत असणार आहे. मात्र, जागावाटपावरून निर्माण झालेल्या अंतर्गत वादांचा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!