ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनसेला आणखी मोठा धक्का; सरचिटणीस स्नेहल जाधवांचा राजीनामा

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्क्यावर धक्के बसत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता मुंबईतून मनसेसाठी आणखी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीची चर्चा सुरू होती. अखेर गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची अधिकृत घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतरच मनसेतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. वॉर्ड क्रमांक १९२ मधून उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याने स्नेहल जाधव नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

स्नेहल जाधव यांनी १९९२ ते १९९७, १९९७ ते २००२ आणि २००२ ते २००७ या कालावधीत सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर २००७ ते २०१२ या काळात त्यांच्या पतीने नगरसेवक म्हणून काम पाहिले. वॉर्ड क्रमांक १९२ मधून कुटुंबाने सलग तीन वेळा निवडणूक जिंकली असतानाही यंदा मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या नाराजीतूनच स्नेहल जाधव यांनी मनसेच्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे मनसेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!