---Advertisement---

नगरपालिकांनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांकडे लक्ष

By team
On: December 31, 2025 10:08 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील तीनही नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. शहरानंतर आता गावपातळीवरील सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे कार्यक्रम कधी जाहीर होणार, याकडे तालुक्यातील जनतेसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या निवडणुका आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने ग्रामीण भागात हालचालींना वेग आला आहे.

राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ठरवून दिलेल्या चौकटीत आहे, अशा ठिकाणीच सध्या निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील काही जिल्हा परिषद आणि त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यात सोलापूरचा समावेश आहे.उर्वरित ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात येणार आहे.

सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक यंत्रणा, कर्मचारी आणि मतदान यंत्रांची उपलब्धता लक्षात घेता या निवडणुका स्वतंत्रपणे घेण्याची तयारी आयोगाने केली असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला ग्रामीण भागात मतदानाचा उत्सव पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

अक्कलकोट तालुक्यात नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने निर्माण झालेले राजकीय चैतन्य अद्यापही कायम आहे. निवडणूक निकालानंतर काही ठिकाणी विजयोत्सव, तर काही ठिकाणी आत्मपरीक्षण सुरू असून त्याच वेळी पुढील निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. संभाव्य उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क वाढवला जात असून गावोगावी बैठका, चर्चा आणि चाचपणी सुरू झाली आहे. अनेक दिवस सत्तेपासून दूर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, युवक आणि विविध घटकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती या संस्थांकडून थेट अपेक्षा असतात. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार यांसारख्या प्रश्नांवर या संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याने निवडणुकांबाबत सर्वसामान्य जनतेमध्येही उत्सुकता आहे. निवडणूक कधी लागणार? हा प्रश्न चहाच्या टपऱ्यांपासून ग्रामसभांपर्यंत चर्चेचा विषय ठरत आहे.

एकूणच, अक्कलकोट तालुक्यात नगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची चाहूल लागली असून ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे. अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पाहत असताना तालुक्यातील वातावरण हळूहळू निवडणूकमय होत चालले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!