---Advertisement---

अमृत २ योजनेअंतर्गत अक्कलकोट पाणीपुरवठा योजनेची नगराध्यक्षांकडून पाहणी

By team
On: January 1, 2026 2:08 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शहरांना ‘जल-सुरक्षित’ आणि ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या केंद्र सरकारच्या अमृत २ योजनेअंतर्गत अक्कलकोट शहरासाठी मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी केली.

या पाहणीदरम्यान त्यांनी कुरनुर धरण येथील पंप हाऊस तसेच अक्कलकोट शहरातील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन प्रत्यक्ष कामाची माहिती घेतली. कामाच्या गुणवत्तेबाबत आणि गतीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या.

अमृत २ योजनेअंतर्गत सर्व शहरांमधील घरांना कार्यात्मक नळ जोडणी देणे, सांडपाणी व सेप्टीक व्यवस्थापन सुधारणे, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे तसेच हरित जागांचा विकास करणे या प्रमुख बाबींवर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अक्कलकोट शहरातही युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.

ही पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर असून ती पूर्ण झाल्यानंतर अक्कलकोट शहराला दररोज नियमित पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून तब्बल ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील असल्याचेही नगराध्यक्षांनी सांगितले.

यावेळी भाजप मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, पाणीपुरवठा अधिकारी मनोज ईश्वरकट्टी, नगरसेवक ऋतुराज राठोड, सुनील सिद्धे, सुनील राठोड तसेच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!