पुणे वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना (शिंदे गट) उमेदवार उद्धव कांबळे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रभा क्रमांक ३६ मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. पक्षांतर्गत एबी फॉर्मवरून निर्माण झालेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गुरुवारी पुण्यात झालेल्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव कांबळे यांची दखल घेतली. “अन्याय होऊ देणार नाही,” असे आश्वासन शिंदेंनी दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कांबळे भावुक झाले. त्यांनी एकनाथ शिंदे हे ‘अनाथांचे नाथ’ असून गोरगरीब कष्टकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाहीत, अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपविरोधात थेट लढाई असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. अनौपचारिक चर्चेत त्यांनी सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या विरोधात ताकदीने निवडणूक लढवणार आहेत. पालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार नियोजन सुरू असून, भाजपच्या कारभारावर लवकरच पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.
महत्त्वाचे म्हणजे पुण्यात भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना युती तुटली असून, शिवसेना (शिंदे गट) १२३ जागांवर तर भाजप १६५ जागांवर निवडणूक लढवत आहे. एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने पुण्यातील राजकीय चित्र आता स्पष्ट झाले असून, महापालिका निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.