नाशिक–सोलापूर–अक्कलकोट महामार्गाला केंद्राचा हिरवा झेंडा
20,668 कोटींचा मेगाप्रकल्प; महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती
सोलापूर प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील पायाभूत सुविधा विकासाला मोठा वेग देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ग्रीनफिल्ड कॉरिडोरला अधिकृत मंजुरी देण्यात आली असून, हा प्रकल्प राज्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि वाहतूक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
या निर्णयाअंतर्गत सुमारे ₹20,668 कोटींच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 374 किमी लांबीचा नाशिक–सोलापूर–अक्कलकोट कॉरिडोर आणि ओडिशातील NH-326 च्या 206 किमी रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण यांचा समावेश आहे.
6 पदरी, अॅक्सेस-कंट्रोल्ड ग्रीनफिल्ड कॉरिडोर
नाशिक–सोलापूर–अक्कलकोट हा ₹19,142 कोटींचा ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प असून, तो बीओटी (Build–Operate–Transfer) तत्त्वावर उभारण्यात येणार आहे. हा सहा पदरी, अॅक्सेस-कंट्रोल्ड कॉरिडोर नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडत पुढे आंध्र प्रदेशातील कुर्नुलपर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत करणार आहे. हा प्रकल्प गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत राबवण्यात येत असून, देशातील एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधांना नवे बळ देणार आहे.
प्रवासाचा वेळ 9 तासांवरून थेट 4 तासांवर
या महामार्गामुळे
नाशिक ते अक्कलकोट प्रवास केवळ 4 तासांत पूर्ण होणार
सध्याच्या तुलनेत 17 तासांची वेळ बचत
तब्बल 201 किमी अंतराची कपात होणार आहे
यामुळे उद्योग, व्यापार, कृषी मालवाहतूक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
प्रमुख द्रुतगती महामार्गांशी थेट जोडणी
हा कॉरिडोर पुढील महत्त्वाच्या महामार्गांशी जोडला जाणार आहे –
दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवे (वाढवन पोर्ट इंटरचेंज)
समृद्धी महामार्ग (नाशिकजवळील पांगरी)
आग्रा–मुंबई कॉरिडोर (NH-60, अडेगाव जंक्शन)
यामुळे पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत अखंड वाहतूक साखळी उभी राहणार आहे.
लाखो रोजगार संधी; जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास
या प्रकल्पातून –
251.06 लाख मॅन-डे थेट रोजगार
313.83 लाख मॅन-डे अप्रत्यक्ष रोजगार
निर्माण होणार असून, नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये आर्थिक उलाढाल, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकासाला गती मिळणार आहे.
दोन टप्प्यांत होणार बांधकाम
महामार्गाचे बांधकाम दोन टप्प्यांत केले जाणार आहे –
नाशिक ते अहिल्यानगर – 152 किमी
अहिल्यानगर ते अक्कलकोट – 222 किमी
एकूण 374 किमी लांबीचा हा महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण महाराष्ट्राचा प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रतिक्रिया
या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “नाशिक–सोलापूर सहा लेन अॅक्सेस-कंट्रोल्ड एक्सप्रेसवे हा विकसित भारताच्या स्वप्नातील महत्त्वाचा घटक आहे. दिल्ली–मुंबई कॉरिडॉरनंतर आता मुंबई–चेन्नई कॉरिडॉरचा हा महत्त्वाचा भाग आहे. पुढील टप्प्यात हा मार्ग कुर्नुल, कडप्पा आणि चेन्नईपर्यंत विस्तारला जाईल.”