---Advertisement---

महायुतीचा धडाका! भाजप–शिवसेनेचे ६६ उमेदवार बिनविरोध विजयी

By team
On: January 3, 2026 2:19 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रात दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद निवडणुकांनंतर आता राज्यातील २९ महापालिकांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असतानाच, एकही मत न पडता सत्ताधारी भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने जोरदार आघाडी घेतली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर राज्यभरात तब्बल ६६ उमेदवार बिनविरोध नगरसेवकपदी निवडून आले आहेत. यामध्ये भाजप–शिवसेनेचा वाटा सर्वाधिक असून, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन उमेदवार बिनविरोध विजयी ठरले आहेत. या घडामोडींमुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीची ताकद स्पष्टपणे दिसून आली आहे.

मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनमधील कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यामध्ये भाजपचे १५ आणि शिवसेनेचे ६ उमेदवार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये भाजप–शिवसेनेचे प्रत्येकी सहा असे डझनभर नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. पनवेलमध्ये सात भाजप उमेदवारांनी, भिवंडीत सहा ठिकाणी तर ठाण्यात शिवसेनेने सहा जागांवर न लढताच विजय मिळवला आहे.

धुळे, अहिल्यानगरसारख्या शहरांतही महायुतीला राजकीय फायदा झाला असून, नगरपरिषद निवडणुकांप्रमाणेच महापालिकेतही सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, मनसेने बिनविरोध निवडींच्या या ट्रेंडवर आक्षेप घेत आंदोलन करत सत्ताधारी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एकूणच, मतदान होण्याआधीच मिळालेल्या या विजयामुळे महापालिका निवडणुकीच्या रणांगणात महायुतीचे मनोबल उंचावले असून, आगामी निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!