मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडत असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे प्रथमच एकत्र येत निवडणुका लढवत आहेत. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची युती अधिकृतपणे जाहीर झाली असून, शिवसेना भवनात झालेल्या कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधूंनी संयुक्त वचननामा सादर केला.
या वेळी व्यासपीठावरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही साधी पण महत्त्वाची कामं केली. कोस्टल रोड, मध्य वैतरणा प्रकल्प आम्ही पूर्ण केले. पण भाजपच्या नेत्यांनी तर जणू चमत्कारच केले—मोदींनी कैलास पर्वत तयार केला, गंगेतून पाणी आणलं आणि मिंध्यांनी अरबी समुद्र बांधला,” अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली.
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले, “कोर्टात जाऊन काय होणार? विश्वास ठेवायचा तरी कुणावर? निवडणूक आयोगावर जर दम असेल, तर त्यांनी थेट निवडणुका रद्द कराव्यात. आरओंचे फोन रेकॉर्ड काढा. की तेही सीसीटीव्ही फुटेजसारखे डिलीट केले?” बिनविरोध निवडणुकांबाबतही त्यांनी तीव्र संशय व्यक्त करत थेट निवडणुका रद्द करण्याचे आव्हान दिले.
कोरोना काळातील कामगिरीचा उल्लेख करताना ते म्हणाले, “त्या काळात आम्ही एक पुस्तिका तयार केली होती, ती आयोगाने रिजेक्ट केली. आता ती मी बेधडक वाटणार आहे. निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही कोरोना काळात काम केलं नव्हतं; आम्ही स्वतः पुढाकार घेतला. आमच्या कामाची जगभरातून प्रशंसा झाली,” असा दावा त्यांनी केला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका करत, “राहुल नार्वेकर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,” अशी स्पष्ट मागणी केली. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या या ऐक्यामुळे राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळणार असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.