---Advertisement---

काँग्रेसने हेकेखोरपणा केला – सुजात आंबेडकर

By team
On: January 4, 2026 6:53 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली आहे. यंदा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली असली, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर या युतीत मतभेद उफाळून आले आहेत. काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला ६२ जागा देण्यात आल्या होत्या. मात्र, वंचितने यापैकी १६ जागांवर उमेदवारच उभे न करता या जागा पुन्हा काँग्रेसला सोपवल्या. मात्र, काँग्रेसलाही त्या जागांवर उमेदवार देता न आल्याने या प्रभागांमध्ये आता भाजप–शिवसेना युती आणि मनसे–शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात थेट लढत होणार आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी थेट काँग्रेसवर आरोप करत, “मुंबईत वंचितने १६ जागांवर उमेदवारी दिली नाही, कारण काँग्रेसने हेकेखोरपणा केला,” असा दावा केला. आंबेडकर म्हणाले की, “आम्हाला ज्या १६ जागा हव्या होत्या त्या काँग्रेसने दिल्या नाहीत. काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या घरातील ६ ते ७ जणांना उमेदवारी द्यायची होती. त्यामुळेच हा प्रकार घडला.”

पुढे बोलताना आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, “मुंबईत काही ठिकाणी आम्ही काँग्रेससोबत एकत्र प्रचार करू, तर काही ठिकाणी वेगवेगळा प्रचार केला जाईल. जशी गरज असेल तसा प्रचार करण्यात येईल.” तसेच त्यांनी ठाकरे गटाचा वचननामा पाहिल्याचे सांगत, “आमचा वचननामा येत्या दोन ते तीन दिवसांत प्रसिद्ध होईल. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आमचे महापौर निवडून येण्याची शक्यता असून, जिल्हा परिषद निवडणुकांवरही आमचे लक्ष असणार आहे,”* असेही स्पष्ट केले.

या घडामोडींमुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली असून, काँग्रेस–वंचित युतीतील तणावामुळे काही प्रभागांमध्ये निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!