मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत थेट आणि खळबळजनक भविष्यवाणी करत, “राज ठाकरे केवळ पराभूत होणार नाहीत, तर त्यांच्या नावावर इतिहासातील सर्वात मोठा पराभव नोंदवला जाईल,” असे ठामपणे सांगितले. निकालानंतर हे चित्र सर्वांना स्पष्टपणे दिसेल, असा दावाही त्यांनी केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती सध्या चर्चेचा विषय असली तरी, या युतीला आता कोणतेही राजकीय वजन उरलेले नाही, असा घणाघात फडणवीस यांनी केला. 2009 सालीच शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते, तर महाराष्ट्राची राजकीय दिशा वेगळी असती, असे सांगत त्यांनी सूचक टिप्पणी केली. मात्र आता वेळ निघून गेली असून, दोन्ही नेत्यांकडे पूर्वीसारखी मतांची ताकद राहिलेली नाही, असा दावा त्यांनी केला.
मनसेप्रमुखांवर थेट निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, या युतीचा लाभ उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो, मात्र राज ठाकरे यांना यातून काहीही मिळणार नाही. राज ठाकरे यांचा मतांचा आधार संपलेला असून, या युतीत त्यांची भूमिका दुय्यम ठरेल. त्यामुळे हा पराभव केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो राजकीय इतिहासात नोंदवला जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
याच मुलाखतीत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही खोचक टीका केली. “जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, पण विचारांचा वारसा मिळत नाही,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना वैचारिक वारसा लाभलेला नाही, असा आरोप केला. या वक्तव्यामुळे ठाकरे गटात संतापाची लाट उसळली असून, बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.