मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी अवघे काही दिवस उरले असताना, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात असतानाच, मुंबईत सोमवारी सकाळी मोठी खळबळ उडाली. राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर बेवारस अवस्थेत एक बॅग आढळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नितेश राणे यांच्या बंगल्याच्या बाहेरील फुटपाथवर एका कोपऱ्यात काळ्या-ग्रे रंगाची सूटकेस भिंतीला टेकवून ठेवलेली आढळून आली. ही बाब लक्षात येताच तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर बॉम्बशोधक पथक, डॉक स्क्वॉड तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, एक तरुण संबंधित बॅग तिथे ठेवून पुढे निघून गेल्याचे दृश्य समोर आले आहे. बॅगची झडती घेत असताना त्यात एक चिठ्ठी आढळून आली. *“Please take free shoes and cloth”* असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिलेला असून, बॅगेत काही कपडे आणि बूट असून ते कोणीही मोफत घ्यावेत, असा संदेश त्यात देण्यात आला आहे.
मात्र, चिठ्ठी सापडूनही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. ही चिठ्ठी नेमकी कोणी लिहिली? मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेरच ही बॅग ठेवण्यामागचा उद्देश काय होता? ती कधी आणि कोण ठेवून गेलं? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण बॅग अत्यंत काळजीपूर्वक तपासली जात असून, त्यात कोणतीही संशयास्पद किंवा घातक वस्तू नाही ना, याची खातरजमा करण्यात येत आहे.
हा परिसर शासकीय बंगल्यांचा असून येथे अनेक मंत्र्यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळेच पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. बॅगची सखोल तपासणी सुरू असून, चिठ्ठी लिहिणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. या घटनेनंतर नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर तसेच आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तसेच नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.