मुंबई वृत्तसंस्था : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा 22 वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये थेट बँक खात्यात दिले जातात, जे 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वितरित केले जातात. आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते वर्षातून तीन वेळा दिले जातात. एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च या कालावधीत हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. योजनेचा मागील म्हणजेच 21 वा हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आला होता. त्यामुळे आता 22 वा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार हा हप्ता मार्च 2026 मध्ये किंवा एप्रिल 2026 च्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो.
दरम्यान, 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत दिली जाते. मात्र वाढती महागाई, शेतीसाठी लागणारा खर्च आणि निविष्ठांच्या किमती लक्षात घेता ही रक्कम वाढवावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
जर आगामी अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेतील आर्थिक मदत वाढवण्याची घोषणा झाली, तर देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे 22 व्या हप्त्यासोबतच निधी वाढीच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.