---Advertisement---

मतं विकत घेण्याचा खेळ? कुठे रोकड, कुठे सोनं-चांदी

By team
On: January 14, 2026 12:58 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, त्याआधीच राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर छुप्या पद्धतीने पैसे वाटप सुरू असल्याच्या आरोपांनी निवडणूक रणांगण अधिकच धगधगते झाले आहे. मुंबई, वसई, डोंबिवली आणि जळगावमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून पक्षांमध्ये थेट संघर्ष उफाळून आला असून, काही ठिकाणी हाणामारी तर डोंबिवलीत हत्येच्या प्रयत्नासारखा गंभीर गुन्हाही घडला आहे.

डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २९ मध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मैत्रीपूर्ण लढत पैसे वाटपाच्या आरोपांमुळे हिंसक वळणावर पोहोचली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत चार कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. भाजप उमेदवाराच्या पती सोमनाथ नाटेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेनेच्या दोन उमेदवारांसह पाच जणांविरोधात कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेले शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईनंतर शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही प्रशासकीय दडपशाही असल्याचा आरोप केला आहे. तर नितीन पाटील यांच्या पत्नी रंजना पाटील यांनी, पतीच्या जिवाला काही झाल्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा दिला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, जळगावच्या ममुराबाद नाका परिसरात निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने नाकेबंदी दरम्यान एका कारची झडती घेतली असता २९ लाख रुपये रोख, ३ किलो चांदी आणि ८ तोळे सोने आढळून आले. संबंधितांनी हा ऐवज बहऱ्हाणपूर येथील सराफाचा असल्याचे सांगितले, मात्र कोणतीही अधिकृत कागदपत्रे न सादर केल्याने पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून सरकारी कोषागारात जमा केला आहे.

वसई पूर्व वॉर्ड क्रमांक १९ मध्येही मध्यरात्री तणाव निर्माण झाला. बहुजन विकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांना पिशव्यांसह पकडल्याचा दावा केला असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र पेल्हार पोलिसांनी या प्रकरणात कोणतीही रोकड हस्तगत न झाल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबईतील बोरीवली पूर्व वॉर्ड क्रमांक १४ मध्येही मनसे कार्यकर्त्यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे चौकशी सुरू आहे.

मतदानाच्या आदल्या दिवशी राज्यातील विविध भागांत घडलेल्या या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!